वाशिम :- लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारी विहित कालावधीत निकाली न काढता दिरंगाई केल्यास संबंधित अधिकार्यांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला. लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा करण्यात दिरंगाई, लोकशाही दिनाला अधिकार्यांची दांडी मारणे आदी मुद्दे सोमवारच्या लोकशाही दिनात विशेष गाजले.
लोकशाही दिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी विविध विभागांकडे प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
कोणकोण उपस्थित होते
यावेळी पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. खांडेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम.जी. वाठ यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गैरजर कर्मचाऱ्यांची घेतली शाळा
द्विवेदी म्हणाले की, लोकशाही दिनामध्ये गैरहजर राहणारे व तक्रारींचा निपटारा करण्यास दिरंगाई करणार्या अधिकार्यांची यापुढे गय केली जाणार नाही. तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदाराचे समाधान करण्यावर अधिकार्यांनी प्राधान्य द्यावे. प्रत्येक तक्रार समजून घेऊन व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारदाराला न्याय देण्याचे काम करावे. प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश द्विवेदी यांनी दिले.